View Answer

अंतराळ दुर्बिणीचे वैशिष्ट्य काय?

What are the special features of a space telescope?

Physics Maharashtra

पृथ्वीभोवती वायुमंडलाचा थर आहे. पृथ्वीतलावरून पाहताना आपल्याकडे लांबून (तारका-आकाशगंगा-तारकाविश्व यांकडून) येणारा प्रकाश या थरातून येतो तेव्हा त्याचे त्या थरात काही प्रमाणात शोषण होते. शिवाय वायुमंडलात लहान-मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या थरांचे दोलन चालू असल्याने प्रकाशाची दिशा कमी-जास्त प्रमाणात बदलते. त्यामुळे वरच्या तारका फिकट दिसतात. शिवाय त्यांच्या बिंबाची दिशा थोडीफार बदलते किंवा बदलत राहते (पाहा प्रश्न तारे का लुकलुकतात? ग्रह का लुकलुकत नाहीत?).

तारका स्पष्ट व स्थिर दिसाव्यात म्हणून वायुमंडलावरून आकाशनिरीक्षण करणे चांगले! त्याकरिता अंतराळात दुर्बीण ठेवण्याचा मानवाने प्रयत्न केला. १९९० मध्ये अंतराळात दुर्बीण ठेवून निरीक्षणांना सुरुवात झाली आणि तिला एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाचे नाव दिले (पाहा प्रश्न विश्व प्रसरण पावत आहे म्हणजे नेमके काय? त्याचे प्रसरण कशात होत आहे?). ही दुर्बीण पृथ्वीतलावरील दुर्बिणीपेक्षा नक्कीच अधिक कार्यक्षम ठरत आहे. अतिशय मंद तारका पाहणे आणि त्यांची ठळक चित्रे उमटवणे हे हबल दुर्बिणीला जमले आहे. तिचे सर्व नियंत्रण अर्थातच पृथ्वीतलावरून होते. खुद्द दुर्बीण अंतराळात सुमारे ६०० किमी.उंचीवर पृथ्वी प्रदक्षिणा करते.

मात्र हबल दुर्बिणीपूर्वी उपग्रहातून अतिनील किरणे, क्ष-किरणे इत्यादींची निरीक्षणे करणाऱ्या दुर्बिणी १९७० पासून सोडल्या होत्या. त्यापेक्षा हबल दुर्बिणीचा प्रकल्प अधिक प्रचंड व भारदस्त आहे. तिचा आकार ठरविताना ती स्पेस शटलमध्ये मावेल इतका जास्तीत जास्त मोठा ठेवला आहे. तिच्यातला आरसा जवळजवळ अडीच मीटर व्यासाचा आहे.

J. V. Narlikar

Author

Pranali Parab

Submitter

Do you think you can improve this answer? Learn how to submit a new answer