View Answer

पृथ्वीपलीकडे जीवसृष्टी असेल का? सूर्यमालेत इतर ग्रहांवर जीवसृष्टी असल्याचा पुरावा आहे का? एकंदरीत अतिप्रगत जीवसृष्टीचा शोध कोणत्या मार्गाने लावावा?

Is there life on other planets beyond the earth or in the solar system? Is there any proof of it? What are the ways to search for extraterrestrial life?

Physics Maharashtra

अंतराळात ताऱ्यांदरम्यानच्या अफाट प्रदेशात प्रचंड वायुमेघ आहेत. त्यात कार्बनिक रेणू असल्याचा भक्कम पुरावा, मिलीमीटर लांबीच्या रेडिओ- मायक्रोवेव्ह दरम्यानच्या लहरींच्या दुर्बिणीद्वारे मिळाला आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या मुळाशी जो डीएनए.चा रेणू असतो त्याचे घटक अशा कार्बनिक रेणूंमध्ये आहेत. तेव्हा कुठल्या न कुठल्या ताऱ्याभोवती एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असणे, अशक्य नाही.

तरीही प्रत्यक्ष पुराव्याअभावी आपल्या आकाशगंगेत अतिप्रगत - म्हणजे मानवांच्याही पुढे मजल मारलेल्या जीवसंस्कृतीची संख्या किती असेल, ते सांगणे अवघड आहे. शास्त्रज्ञांच्या अटकळी मात्र चालू आहेत. १००-२०० अब्ज तारे असलेल्या आपल्या आकाशगंगेत अशा संस्कृतीची संख्या लाखात मोजण्याइतपत असावी असा एक सामान्य समज आहे.

अशा संस्कृतीचे अस्तित्व शोधण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे मोठाले रेडिओ ॲण्टेना उभारून काही जवळपासच्या ताऱ्यांजवळून माहिती असलेले संदेश येतात का ते पाहणे. गोंगाटातून असे संदेश शोधण्याचे तंत्रज्ञान आता बरेच विकसित झाले आहे. पण हे संदेश कुठल्या भाषेत असतील? कुठल्या लहरीच्या माध्यमाने ते येतील?

असे गृहीत धरले की अतिप्रगत जीवांना माहीत असलेले विज्ञान सगळीकडे तेच आहे तर हे संदेश आपल्याला अवगत असलेल्या गणिताची आणि विज्ञानाची भाषा वापरतील. गणित संगणकांना परिचित असलेले दोन अंकांचे असेल. खगोलविज्ञानानुसार आकशगंगेत सर्वव्यापी असलेल्या हायड्रोजन अणूतून निघणाऱ्या २१ सेंटीमीटर लांबीच्या लहरी दूरगामी असून सर्व संस्कृतींना परिचित असतील.

तेव्हा अशा लहरीच्या बॅण्डमध्ये पुष्कळ चॅनल एकाच वेळी चालवून काम करणारे रिसीव्हर रेडिओ दुर्बिणीना बसवून असे संदेश शोधण्याचे काम चालू आहे. काही संदेश आपणही पृथ्वीवरून इतर ताऱ्यांकडे पाठवले आहेत. पण अद्याप अतिप्रगत शेजाऱ्यांचा पत्ता लागलेला नाही.

आपल्या ग्रहमालेत मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. व्हायकिंग याने (I आणि II) मंगळावर गेली तेव्हा त्यांनी याबाबत केलेले शोधप्रयोग नकारार्थी परिणाम दर्शवत होते. पण त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका आहे. इतर ग्रहांवर जीवसृष्टीची संभाव्यता आणखी कमी आहे. एकविसाव्या शतकात मंगळावर माणूस जाऊन स्वत: आणखी चाचण्या घेऊन या प्रश्नाचा छडा लावेल.

J. V. Narlikar

Author

Pranali Parab

Submitter

Do you think you can improve this answer? Learn how to submit a new answer